सिडकोत घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास

Foto

औरंगाबाद- सिडको एन-११ येथील नवजीवन कॉलनीत रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी कुलूप लावलेले घर फोडले. चोरट्यांनी घरातील लाखो रुपयांचा ऐवज पळवला असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दुपारपर्यंत सुरू होती. 

 

मागील काही दिवसांपासून सिडको परिसरातील घरांना चोरट्यांनी टार्गेट केले आहे. त्यातच नाताळनिमित्त सुटी असल्याने चोरट्यांचे फावत चालले आहे. सिडको एन-११ मधील नवजीवन कॉलनी येथील सचिन कुलकर्णी यांच्या घराला मध्यरात्री चोरट्यांनी लक्ष्य केले. चोरट्यांनी कुलकर्णी यांच्या घरात प्रवेश करून कपाटातील सोना-चांदीचे दागिने व इतर साहित्य मिळून लाखो रुपयांचा ऐवज पळविला.

 

चोरी झाल्याची घटना आज सकाळी कुलकर्णी यांच्या लक्षात आली. यावरून त्यांनी तत्काळ सिडको पोलिस ठाण्याला घटनेची माहिती कळविली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ श्‍वान पथकासह धाव घेतली. घटनास्थळी गुन्हे शाखेचे अधिकारी व सिडको पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी भेट देऊन पाहणी केली. या घटनेत चोरट्यांनी नेमका किती रुपयांचा  ऐवज पळविला हे दुपारपर्यंत कळू शकले नाही. 

 

सुटीची संधी साधून चोरट्यांचा डल्‍ला 

 

नागरिक बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरटे डल्‍ला मारत आहेत. सिडको परिसरात राहणार्‍या बँक अधिकार्‍यांच्या घरी चोरट्यांनी डल्‍ला मारला होता. आता नाताळ सणानिमित्त सुटी लागली आहे. याचा फायदा घेऊन पुन्हा चोरट्यांनी सिडको परिसरात चोरी केली. त्यामुळे नागरिकांनी बाहेरगावी जाताना पोलिसांना माहिती देणे गरजेचे आहे. मात्र नागरिक पोलिसांना माहिती न देताच बाहेरगावी जात आहेत. त्यामुळे चोरट्यांचे फावत आहे. पोलिसांनीही रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.